ग्रामपंचायत कासारी विषयी माहिती

कासारी हे पुर्वेला काजळी नदी व पश्चिमेला अरबी समुद्र तसेच उत्तरेला काजळी नदी व अरबी समुद्राचा सुरेख संगम व दक्षिणेला डोंगराच्या कुशीत  असा निर्सगाच्या सानिध्यात वसलेले गाव आहे. कासारी गाव रत्नागिरी शहरापासुन 1 कि. मी इतके अंतरावर वसलेले आहे.  कासारी गावाला 2 कि.मी समुद्र किनारा लाभलेला आहे. कासारी गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 3248 इतकी आहे. कासारी गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व मासेमारी असा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील पहिले आरमार प्रमुख मायाजी भाटकर उर्फ मायनाक भंडारी यांचे जन्म गाव असुन त्याची समाधीस्थळ देखील कासारी गावामध्ये आहे.  कोकण कृषी विदयापीठ अंतर्गत नारळ संशोधन केंद्र गावामध्ये आहे.  कासारी गावामध्ये बहुसंख्य समाज मुस्लिम व हिंदु आहे. गावामध्ये कोणत्याही प्रकारचा धर्मामध्ये वादविवाद होत नाही. कासारी गावामध्ये सर्वधर्मसमभाव आहे. कासारी येथे पीर शाक्रामुद्दीन दर्गा आहे. माघ महिन्याच्या पौर्णिमेला उरुस (उत्सव) साजरा करण्यात येतो. हा उत्सव 20000 ते 25000 हिंदु मुस्लिम लोक एकत्र येवुन साजरा करतात. हे कासारी गावातील हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे.

कासारी गावातील समुद्किना-याजवळ प्रसिध्द श्री झरीविनायक मंदिर आहे. दरवर्षी श्री झरीविनायक मंदिर येथे मोठया उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवा दरम्यान सुमारे 40000 ते 50000 भाविक या उत्सवात सहभागी होतात. तसेच फाल्गुन महिन्यात मोठया उत्साहात गावामध्ये ग्रामदैवत श्री लक्ष्मीकांत पालखीचा शिमगोत्सव साजरा होतो. त्याकरीता कासारी गावातील चाकरमणी गावामध्ये येवुन उत्सवात सहभागी होतात.

संगीतकार वासुदेव भाटकर उर्फ स्नेहल भाटकर, सिने व नाटय अभिनेते रमेश भाटकर यांचे मुळ गाव कासारी आहे.  त्यांनी कासारी गावाचे नाव सिनेसृष्टीमध्ये अजरामर केले.  कै. परमांनद जनार्दन पिलणकर तसेच त्यांचा मुलगा श्री. अक्षय परमानंद पिलणकर यांना नारळावर कलाकृती काढणेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने कोचीन येथे गौरवण्यात आले. कासारी समुद्किना-यावर रत्नागिरी तालूका जिल्हयासह बाहेरील राज्यातील पर्यटक तसेच देश विदेशातील पर्यटक मोठया प्रमाणावर येत असतात.

ग्रामपंचायत कासारी ही स्थानिक स्वराज्य संस्था गावाच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कासारी गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आणि गाव स्वयंपूर्ण व प्रगतिशील करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

गावातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हरितीकरण, सामाजिक सुरक्षा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गावातील सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांच्या योजनांचा अंमल ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक पातळीवर केला जातो.

प्रमुख योजना व उपक्रम
• प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना – गरजू कुटुंबांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे.
• मनरेगा (रोजगार हमी योजना) – ग्रामीण बेरोजगारांसाठी रोजगारनिर्मिती.
• स्वच्छ भारत अभियान – गावातील घरे, शाळा व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी उपक्रम.
• महिला व बालकल्याण कार्यक्रम – महिला बचत गटांचे सक्षमीकरण, पोषण आहार योजना, अंगणवाडी सेवा.
• शिक्षण व आरोग्य सुविधा – प्राथमिक शाळांची देखभाल, आरोग्य शिबिरे व जनजागृती कार्यक्रम.
• पर्यावरण व हरितीकरण – वृक्षलागवड, जलसंधारण व स्वच्छ, सुंदर, हरित ग्राम उपक्रम.

ग्रामपंचायत कासारी गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून कार्य करते. ग्रामसभा ही गावातील सर्व निर्णयप्रक्रियेचे प्रमुख व्यासपीठ असून त्याद्वारे लोकशाही पद्धतीने गावाचे नियोजन केले जाते. पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून पंचायतराज प्रणाली बळकट करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत सातत्याने करते.

ग्रामपंचायत कासारी चे ध्येय म्हणजे –
• कासारी गाव स्वच्छ, सुंदर व हरित बनविणे
• नागरिकांच्या जीवनमानात सातत्याने सुधारणा करणे
• शाश्वत विकास साधून पुढील पिढ्यांसाठी सक्षम गाव घडविणे

ग्रामपंचायत कासारी ही फक्त प्रशासनाची यंत्रणा नसून गावकऱ्यांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. लोकसहभाग, शासकीय योजना व स्थानिक नेतृत्व यांच्या समन्वयातून कासारी गाव विकासाच्या मार्गावर सातत्याने पुढे जात आहे.